Tuesday 18 September 2012

ऊन-सावली


लेखन- लखीचंद जैन

 
 काही दिवसांपूर्वी कामाच्या निमित्तानं पुण्याला जाणं झालं. स्वारगेटला एका बसथांब्यावर शहर बसची वाट बघत उभा असतांना सायकली दु-चाकीचारचाकी वाहनांच्या आणि माणसांच्या वर्दळीत समोरच्या दिशेला ऊन-सावलीच्या खेळातून वेगवेगळ्या पृष्ठभागांवर पडणा-या छाया-प्रकाशाचा आनंद मी घेत होतो.
ऊन-सावलीचा खेळ तसा मला नव्याने नव्हता. लहानपणापासून या खेळाची मजा मी अनुभवत आलोय. ललित कलेच्या क्षेत्रात पाऊल ठेवल्यापासून तर ऊन-सावली आणि त्यातून तयार होणारा छाया-प्रकाश आणि पोत या कडे  बघण्याची दृष्टीच बदलली आहे; पण आजचा खेळ बघतांना मला वेगवेगळं काहीतरी जाणवत होतं. कारण, माझ्या डोक्यात जो विषय घोळत होता; ‘त्याविषयाशी या खेळाची नाळ कुठेतरी जुळली असल्याचं सारखं वाटत होतं. बसच्या प्रतीक्षेत ऊन-सावलीच्या खेळाची नव्यानं उजळणी झाली.  
बघता-बघता डोक्यावरचा सूर्य ढगाआड जातो नि हळूच ऊन जाऊन सावली येते; मग पुन्हा ढगाआडून सूर्य समोर येतो नि सावली जाऊन परत ऊन पसरतं. चित्रपटातलं एखादं दृश्य Fade in.. Fade out व्हावं, त्याप्रमाणं ऊन, सावलीत आणि सावली उन्हात अलगदपणे एकरूप होत असते, एकमेकांत मिसळत असते. असंच काहीसं ती आणि मीतल्या नात्याचं असतं. सकाळ, दुपार आणि मावळतीला पसरणा-या ऊन-सावलीचा अनुभव वेगवेगळा असतो. प्रत्येक प्रहरातल्या ऊन-सावलीच्या खेळाची आपली वेगळी अशी खासियत आहे.
ऊनसावलीच्या खेळासारखा खेळप्रत्येक जण आपल्या जीवनात सुख-दु:खाच्या रूपात अनुभवत असतो. यात ती आणि मीया दोघातलं नातं जर घट्ट असेल, दोघांना आपापली भूमिका नि जबाबदारी नीट ठाऊक असेल. शिवाय, सामंजस्यपणा त्याच्या जोडीला असेल तर भरती-ओहोटीत अर्थात् सुख-दु:खाच्या काळातही आपल्याला ऊन-सावलीच्या खेळाची रंगत एन्जॉयकरता येते.
उन्हात फिरून, घामानं चिंब भिजून सावलीच्या आडोश्याला आलं, की सावलीचा...सावलीच्या सोबतीला असलेल्या हवेच्या झुळुकीचा स्पर्श नि तिच्या गारव्याचा आनंद आपल्याला घेता येतो. यातच खरी मजा असते... जगण्याची, जीवनातल्या ऊन-सावलीची..!

No comments:

Post a Comment