Monday 8 October 2012

फिफ्टी...फिफ्टी...



लेखन : लखीचंद जैन
...
साधारणपणे तीनेक वर्षांपूर्वी कामाच्या निमित्तानं ठाण्यापासून पन्नासेक किलोमीटर दूर... हिरवाईनं वेढलेल्या एका टेकडीवरच्या गेस्ट हाउसमध्ये एक आठवडाभर राहण्याचा प्रसंग मला आला होता, तेव्हाची नि तिथली ही गोष्ट. गेस्ट हाला लागून टेरेस होता. टेरेसवर जाण्यासाठी असलेल्या तीन-चार पाय-यांच्या लोखंडी जिन्याखाली मांजर आणि बोक्याचं बि-हाड होतं.  दोघं दिवसभर कुठेतरी फिरत नि काळोख झाल्यानंतर परतत... इथं राहणा-यांपैकी कुणी न कुणी त्यांच्यासाठी दूध किंवा खाण्यासाठी काहीतरी काढून ठेवत असत.
...
अॅनिमेशन फिल्म निर्मिती क्षेत्रात असताना, डिस्नेच्या 101 Dalmatians याशिवाय, आणखी एका अॅनिमेशन मालिकेच्या पायलट टेस्ट प्रोजेक्टसाठी काम करतेवेळी मी पाळीव प्राण्यांच्या Anatomy व जीवनशैलीचा... त्यानंतर फॅशन डिझायनिंग क्षेत्रात अॅनिमल प्रिंट्सला घेऊन डिझायनिंग करण्यापूर्वी प्रत्यक्ष जंगलांमध्ये जाऊन अनेक पशू-पक्ष्यांचा बारकाईनं अभ्यास केला होता. म्हणून या मांजर आणि बोक्याविषयी माझ्या मनात वेगळी उत्सुकता होती. शिवाय, कारणही थोडं निराळंच होतं...
...
अजूनही आठवतं, एकदा गेस्ट हाउसमधल्या एका गडयानं, या मुक्या जीवांसाठी जीन्याखालच्या एका कोप-यात वाटीभर दूध ठेवलं होतं. काही वेळानं, बोक्या तिथं आला तेव्हा त्यानं वाटीमधलं सगळं दूध न पिता त्यातलं अर्ध दूध पिऊन बाकीचं दूध तसंच ठेवलं मांजरीसाठी... काही वेळानं मांजर आली नि तिनं उरलेलं दूध संपवलं. तीन-चार दिवसांनी असाच प्रसंग पुन्हा अनुभवायला मिळाला... या वेळी मांजरीनं अर्धी वाटी दूध शिल्लक ठेवलं होतं ते बोक्यासाठी... मग काही वेळानं बोक्या तिथं टपकला... त्यानं उरलेलं दूध मिटक्या मारत संपवलं. या दोघांसाठी खायला काहीही ठेवलं तरी दोघांपैकी कुणीही ते पूर्णपणे संपवत नव्हतं... दोघं जे काही मिळेल ते वाटून खायचे-प्यायचे. कधीकधी खायला-प्यायला काही नसेल तेव्हा दोघं हिरमुसल्यागत शांतपणे कुठेतरी कोप-यात जाऊन बसत. 
या दोन मुक्या जीवाचं एकमेकांतल नातं नेमकं काय होतं; ते त्यांचं त्यांनाच ठाऊक! दोघांची एकमेकांसाठी जगण्याची कमिटमेंट मात्र ही 50/50 होती. वयात आलेली नर मांजर (बोका) आणि मादी मांजर (मांजरी) हे सहसा एकत्र राहणं पसंत करीत नाहीत. शिवाय सगळे पाळीव किंवा हिंस्र प्राणी हे विशिष्ट वयात आले, की त्यांच्यासाठी एकच नातं शिल्लक राहतं; ते नर आणि मादी या स्वरूपाचं. असं असताना हे दोघं जीव एकमेकांसाठी एवढे समर्पित नि एकरूप कसे काय झाले, असा प्रश्न त्या वेळी सारखा मनात घोळत असायचा. 
...
50/50 चा विषय निघाला, की सात-आठ वर्षांपूर्वीची एक गोष्ट आठवते... दिल्लीहून भोपाळच्या दिशेनं रेल्वे प्रवास करीत असताना आग्रा इथंविवाहित जोडपं मी प्रवास करीत असलेल्या बोगीत चढलं नि माझ्या समोरच्या सीवर येऊन बसलं... सुरवातीलाच त्यांनी स्वतःहून त्यांची मला ओळख करून दिली नि माझीही ओळख करून घेतली... हळूहळू आम्ही एक-दुस-याशी मोकळेपणानं बोलायला लागलो...
...
या दोघांनी तीन-चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता... मुलगी मराठी... कोल्हापूर-साता-याकडची, अनं मुलगा हिंदी भाषिक... इंदूर-भोपाळकडचा. दोघं सुशिक्षित... नोकरीच्या निमित्तानं बंगळुरू येथे वास्तव्याला. हळूहळू गप्पा रंगल्या... भूक लागली होती... पण बिस्किटव्यतिरिक्त त्यांच्याजवळ काही नव्हतं म्हणून बिस्किटं खात-खात त्यांचा संवाद सुरूच होता... जेव्हा जेव्हा मी काही विचारायचो... तेव्हा ती दोघं मात्र उत्तर देताना हातातला बिस्किटाचा पुडाही दाखवायची... तो पुडा होता 50/50 चा...! त्यांच्याशी संवाद करतांना जाणवलं होतं, की त्यांच्या जगण्याचा फंडाच मुळात 50/50 वर आधारलेला आहे. त्यांच्याशी अधून-मधून संवाद होत असतो... ते दोघं आजही 50/50 च्या फंडयाला फॉलो करत एकत्रपणं रहात आहेत... आता त्यांचा स्वतःचा फ्लॅट आहे, शिवाय नर्सरी शाळेत जाणारी चिमुकली अमेया जोडीला आहे.
...
एकमात्र खरं, की कुठलंही नातं वीणत असतांना जर एकमेकांनी 50/50 अर्थात् बरोबरीनं एकरूप होऊन, त्याला  सामंजस्यतेची जोड देत नीटपणं बंध गुंफले, तर नात्यांची ‘ती’ वीण सहजासहजी उसवणार नाही... त्यात पीळही पडणार नाही आणि ती एकाएक तुटणार नाही... उलट ‘ती’ नाती खुलत, फुलत नि अधिक घट्ट होत जातील... ‘ती आणि मी’ या आत्मकथनातील पात्रांसारखी! 50/50 म्हणजे हसतं-खेळतं जीवन जगण्यासाठी हवी असलेली एकमेकांची... एकमेकांसाठीची अटॅचमेंट, अॅड्जस्टमेंट नि कमिटमेंट...!



No comments:

Post a Comment