लेखन : लखीचंद जैन
...
आजही आठवतात दांडियाचे
‘ते’ दिवस नि दांडियाच्या ‘त्या’ रात्री... साधारणपणं वीसेक वर्षांपूर्वी मी
औरंगाबादमध्ये असताना, दांडियावर एका जाहिरात कॅम्पे्नचं डिझायनिंग करत होतो.
त्या वेळी आताच्या ‘तुकाराम’ या चित्रपटासाठी गीतं लिहिलेल्या गीतकार दासूनं
माझ्या खोलीवर गप्पा मारता-मारता एका कागदी चिटो-यावर सहज म्हणून काही ओळी
लिहिल्या होत्या. दरवर्षी नवरात्रीत टिप-यांची टिक्-टिक् कानी पडली, की-
तो ‘ती’ ला म्हणाला,
उद्या कुठे भेटशील ?
ती म्हणाली, भेटू की...
जिथं पैंजण फेर धरतात
तिथं…
या दासूनं लिहिलेल्या ओळी
आठवत असतात.
…
तेव्हा मी सराफ्यातून पान
दरिब्याला जोडणा-या बोहरी कठडयातील साहुजी बिल्डिंगमध्ये भाडयाच्या खोलीत
कॉलेजच्या तिस-या वर्षापासून राहत होतो. इथं राहून मी स्थानिक वर्तमानपत्रांच्या रविवार आवृत्यांसाठी
रेखांकन, अक्षरांकन, आकाशवाणी आणि भारतातील काही मासिकांसाठी लेखन याशिवाय
डिजायनिंगची कामं करीत असे. या खोलीत माझं सातेक वर्षं वास्तव्य होतं. सराफ्यातील
एका पानटपरीच्या बाजूला बंद असलेल्या दुकानाच्या ओटयावर बसून तिथं सुचलेल्या अनेक
कल्पनांनी मला डिजायनिंगचे नॅशनल अॅवॉर्डस् आणि नॅशनल यूथ अॅवॉर्डसारखे मान-सन्मान
मिळवून दिले. माझी खोलीही ‘डिझायनिंग लॅब’... नि तो ओटा आमच्यासाठी एकप्रकारचा कट्टा
होता. इथं मी आणि माझे मित्रं नेहमी बसायचो नि वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायचो.
किल्लारीच्या भूकंपावर आधारलेलं कॅम्पेन, निरक्षरांसाठीची ‘अक्षरयात्रा’ यासारख्या
अनोख्या प्रयोगाची कल्पना या कट्टयावरील गप्पांतून प्रत्यक्षात उतरली होती.
…
1990 च्या आसपास औरंगाबादमध्ये ‘दांडिया’ची कंन्सेप्ट नुकतीच रुजली होती, दांडियाच्या
जाहिरात कॅम्पे्नसाठी एक थीम घेऊन ती मला नवरात्रभर रंगवायची होती. विषय नवा...
इंट्रेस्टिंग होता खरा; पण मी मात्र दांडिया कधी
बघितलेला नव्हता नि खेळलेला नव्हता. शिवाय, माध्यमाचं नि जागेचं-आकाराचं बंधनही
होतं... अखेर मोठया कल्पकतेनं ते कॅम्पेन फायनल केलं नि ते दररोज रिलीज होत
गेलं... या कॅम्पेननं मात्र माझ्या आठ रात्र खराब केल्या... दररोज दांडिया
खेळण्याची नि बघण्याची सक्ती मला भोगावी लागली होती. विवेकानंद कॉलेजच्या
ग्राऊंडवरचा हा दांडिया खेळून रूमवर परतलो, की रात्री दोन-अडीचपर्यंत जागायचो...
दांडियात जे काही अनुभवायचो त्याच्या आधारावरच कॅम्पे्नची कॉपी लिहायचो. त्यामुळे
डोक्यातील थीम हळूहळू प्रत्यक्षात उतरत होती...
…
त्या वेळची एक गोष्ट
अजूनही मला आठवते... दांडियाच्या पहिल्याच दिवशी एका अनोळख्या मुलीची टिपरी चुकून
माझ्या टिपरीला लागण्याऐवजी बोटाला जोरात लागून अंगठयाजवळच्या बोटातून रक्त
ओघळायला लागलं होतं. बोटातून रक्त येत असल्याचं त्या मुलीच्या लक्षात येताच,
‘सॉरी’ म्हणत तिनं स्वतःच्या रुमालानं रक्त पुसलं. त्यानंतर दुस-या दिवसापासून
पुढची सात-आठ दिवस ती न चुकता मला भेटायची नि माझ्याशी बोलायची... बोटाची विचारपूस
करायची. दररोज दांडिया संपल्यानंतर जशी टिपरी आपल्यासोबतच्या दुस-या टिपरीला
पुन्हा हमखास भेटेनच असं नाही; तशी ‘ती’ दांडियानंतर पुन्हा कधीच मला भेटली
नाही... नकळत झालेल्या चुकीसाठी कुणी मला ‘सॉरी’ म्हणण्याचा नि उत्तरादाखल ‘इट्स ओ
के’ म्हणत, झालं गेलं ते विसरण्याचा हा माझ्या जीवनातला पहिला प्रसंग.
…
औरंगाबाद सोडून नि
मुंबईला येवून मला जवळपास 16-17 वर्षं झाली. त्यानंतरच्या काळात मी कधीच दांडिया-गरबा
बघितला नाही नि अनुभवलाही नाही; परंतु दरवेळेला नवरात्रीत टिप-यांची टिक्-टिक्
कानी पडली, की दांडियाचे कॅम्पेन आणि त्यासाठी घालवलेल्या आठ रात्री.. मात्र
डोळ्यांसमोर उभ्या राहत असतात. टिपरीवर टिपरी पडून जी टिक्-टिक् नि असंख्य
टिक्-टिक् मिळून तयार होणारी एक आगळी टिक्-टिकची गुंज माझ्या कानी सतत गुंजत असते...
पैंजणांची छन्-छन्... घाग-याची गिरकी... फेर घेत थिऱ्कणा-या लयदार आकृत्या आजही
मला खुणवत असतात...
…
नवरात्रीत दांडिया
संपल्यानंतर घरी परतणारी रंगी बेरंगी पारंपरिक वेशभूषेतील तरुण पोरं-पोरी नि त्यांच्या हातातल्या
टिप-या नजरेस पडल्या, की मन ‘त्या’ टिपरीच्या शोधात भूतकाळात घेऊन जातं नि तिथं
असंख्य टिप-यांत तिला शोधत बसतं. आपलं जीवनही टिप-यांसारखं आहे... ‘ती’ कधी भेटेल
नि ती केव्हा आपल्यापासून दुरावेल, हे सांगणं कठीण आहे.
…
दांडियात कुणाचं मन
राधेच्या तर कुणाचं कृष्णाच्या शोधात असतं... टिपरीला टिपरी भिडली, की त्यातून नव्या
नात्याची रुजवात होत असते... नवरात्रीत पैंजणांचे फेर नि घाग-याच्या गिरकीची गती
जसजशी वाढते तसतशी टिप-यांच्या टिक्-टिकी्त ह्रदयाचीही टिक्-टिक् सामावत असते...
…
आता दांडियात थिरकणारी
पाऊलं... दांडिया संपल्यावर सरळ घराकडं न वळता, हळूच दुस-या वेगळ्या वाटेनं
वळतांना... रात्री उशिरा घरी परततांना दिसली, की क्षणभर मन सुन्न होऊन जातं, नि मग
टिप-यांची टिक्-टिक् मागे पडून भिंतीवरच्या घडयाळाची टिक्-टिक् तेवढी कानी येत असते...