Thursday 20 September 2012

ती : श्रद्धा नि सकारात्मक ऊर्जा


लेखन- लखीचंद जैन
***
नेहमीप्रमाणं  याही  वर्षी माझ्या घरी दहा दिवसांच्या श्रीगणेशाचं आगमन झालंय. या वेळी मुलांचा उत्साह जरा जास्तच आहे. अमित कॉलेजला गेल्यानं त्याचं नवीन फ्रेण्ड्सचं सर्कल जमलंय आणि क्षितिजच्या सोबतीला फेसबुक भेटलंय. घरात नुसती धमालउत्सवी वातावरण आहे. प्रत्येकाचा ‘श्रीगणेशा’ घरी येताच फेसबुकवरही अपलोड झालाय आणि त्याला लाइक्स मिळताहेत...शेअर केलं जात आहे. यंदाचा गणेशोत्सव मात्र जरा हटकेच आहे.
खरोखर, ‘श्रीगणेशा’च्या आगमनानं अवघं वातावरण कसं भक्तिमय होऊन जातं. बच्चे कंपनी तर गणेशाच्या येण्यानं इतकी भारावून जाते, की गणेशाच्या रूपात त्यांना जणू दहा दिवसांसाठी एक खास दोस्त भेटायला आलेला असतो. गणेशासोबत त्यांची इतकी गट्टी जमते, की विसर्जनाच्या वेळी अक्षरशः त्यांचे डोळे पाणावतात. विसर्जनानंतर काही मुलं तर एवढी हिरमुसतात, की ती दोन-तीन दिवस कुणाशी धड बोलत ही नाहीतनीट वागत नाहीतकाही खात नाहीत की पीत नाहीत. लहानग्यांची जी अवस्था होते तशीच अवस्था मोठयांचीही होतेअसं का होतं? आणि यामागचं नेमकं कारण तरी काय?  खोलात शिरलं की उत्तर हाती येतंते उत्तर म्हणजे आपल्याशी जुळलेली ‘ती’  ती म्हणजे श्रीगणेशाच्या प्रती असलेली श्रद्धा. 
वयाच्या नवव्या वर्षापासून माझी ही गट्टी जुळलीय ‘गणेशा’शी, ती शाडू आणि कौलं बनविण्यासाठी लागणा-या मातीच्या माध्यमातून. त्या वयात मी शाळा सुटल्यानंतर मातीसोबत खेळत बसायचो, मातीत नव-नवे आकार शोधायचो आणि गणेशाच्या मूर्तीही  बनवायचो
हळूहळू मातीची सोबत सुटली नि तिची जागा पेन्सिलीनं घेतली. कागदावर चिडीमिडी चित्रं काढण्याचं वेड त्या वयात मला लागलं होतं. या वेडेपणातून मी दिवाळीला माझ्या घराच्या ओटयावरच्या भिंतीवर ५ ते ७ फूट उंच गणपती व इतर देवी-देवतांची चित्रं काढायचो कधीकधी गावकरी मंडळी मी रंगविलेल्या गणपतीला नमस्कार करून तिथं दहा-वीस पैसे ठेवून जात या जमलेल्या पैशांतून त्या वेळी माझा लिमलेट गोळ्यांचा आणि रंगांचा खर्च निघायचा.
दहावीनंतर औरंगाबादच्या स्कूल ऑफ आर्टमध्ये पाऊल ठेवलं. इथनं सुरू झालेल्या कलाप्रवासात मी ‘मांडण्या’तून गणेशाची कितीतरी रूपं मांडलीय कॅनव्हासवर. त्यातली काही विदेशातही पोहोचलीय. भरभरून दिलंय गणेशानं. अजूनही मी गणेशाच्या नव-नव्या रूपांच्या शोधात असतो.
पंधरा वर्षांपूर्वी मुलांमध्ये संस्कारांची पेरणी व्हावी, या भावनेतून घरात दहा दिवसांचा गणपती बसवयाला सुरवात केली होती. आता मुलं जसजशी मोठी होताहेत तसतशी, ती माझ्याप्रमाणं ‘श्रीगणेशा’शी घट्ट जुळत चालली आहेत. आता तर घरातल्या दहा दिवसांच्या गणपतीची आरती व पुजेची जबाबदारी त्यांनी स्वीकारलीय.
गणेशोत्सवाच्या काळात, कामानिमित्तानं मी भारतात कुठंही असलो, तरी श्रीगणेशा मात्र मला स्थापनेच्या किंवा विसर्जनाच्या दिवशी बोलावूनच घेतो. याही वेळी मी स्थापनेच्या दिवशी घरी नव्हतो; अजून ३-४ दिवस मुंबईबाहेर असेन. मला पूर्ण विश्वास आहे, की विसर्जनाच्या पूर्वी माझी नि ‘श्रीगणेशा’ची भेट जरूर होणार आहे. त्यामागचं कारण म्हणजे त्याच्याप्रती असलेली माझी ‘ती’ नितळ श्रद्धा.
माझ्या मते, जीवन प्रवासात आपण कुणावर तरी श्रद्धाविश्वास ठेवणंसमर्पित होणं गरजेचं आहे. श्रद्धा ही एखादी मूर्ती, व्यक्ती, प्रवृत्ती, मूर्त-अमूर्त आकृती किंवा कलाकृती केंद्रित असू शकते. शिवाय, श्रद्धा ही एक अशी गोष्ट आहे, की जी वास्तवात नाही; पण तिचं अस्तित्व मात्र जरूर आहे. एकदा आपण ‘ती’चं अस्तित्व मान्य केलं ‘ती’च्याशी जुळत नि समर्पित होत गेलं की मग; तिच्या माध्यमातून आपल्याला एकप्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळत जाते. नवं सृजन घडविण्यासाठी आत्मविश्वासानं पुढं पाऊल टाकण्यासाठीउत्सवी जीवन जगण्यासाठी

No comments:

Post a Comment