Sunday 23 September 2012

नात्यांपलीकडचं नातं

 

लेखन- लखीचंद जैन
***
साधारणपणे तीस-पस्तीस फूट उंचीचं एक झाड आहे... बदामाचं! अवती-भोवतीच्या बहरलेल्या झाडांच्या गर्दीतही हे झाड मात्र, माझं सारखं लक्ष वेधून घेत असतं... तसं पाहिलं, तर विशेष असं काहीही नाही या झाडात; पण आपली बघण्याची दृष्टी जर वेगळी असेल. शिवाय, निसर्गाशी गुजगोष्टी करण्याची सवय असेल तर ‘ते’ आपल्याला बरंच काही सांगून जातं... देऊन जातं...
हे झाड पूर्वी खूप बहरायचं.. फुलायचं.. या झाडाच्या फांद्यांवर पक्ष्याचं रोजचं उठणं-बसणं होतं. मात्र, तीन-साडेतीन वर्षांपूर्वी या झाडाला कुठलीतरी कीड... व्याधी लागली. बघता-बघता बहरलेलं हे झाड उजाड झालं... एकेक करत पानांनीही त्याची सोबत सोडली. पक्ष्यांनीही उठणं-बसणं बंद केलं... सालही वाळून त्याच्यापासून अलग होत गेली आणि हे झाड पांढरफट्टक पडलं, माणसाच्या हाडाचा सापळा कसा दिसतो तसं! मात्र, अजूनही हे झाड तग धरून आहे. कुठल्यातरी आशेनं.. हे चित्र होतं गेल्या वर्षांपर्यंतचं...
आताचं चित्र काहीसं वेगळं आहे.... हे झाड आजही जसंच तसं उभं आहे. गेल्या वर्षी माळ्यानं या झाडाच्या बाजूला एक बोगन वेल लावली. ती रुजली... हळूहळू वेल वाढत होती… कुठल्यातरी निमित्तानं तिची या झाडाशी ओळख झाली... दोघांची चांगली गट्टी जमली नि ओळख ‘मैत्री’त बदलली.... मग ती त्याला बिलगत... वेढत गेली. आता ही वेल खुललीय... फुललीय... तिला सुंदर अशी गुलाबी फुलंही लागलीय. फांद्या-फांद्यांवर वेल मुक्तपणे खेळत... पसरत... वरवर चढत चाललीय. शिवाय, तिला भरभरून फुलं लागल्यामुळे आता एक वेगळीच रौनक आलीय या झाडाला... मृतप्राय झाडात या वेलीनं एक नवा श्वास भरलाय... आणखी काही काळ जगण्यासाठी...!
काही दिवसांतच ही वेल या झाडाच्या फांद्यांसोबत खेळत शेंड्यापर्यंत जाईल. शिवाय, तिच्या फुलांच्या संख्येत अजून काही फुलांची भर पडेल, तेव्हा या झाडाचा नूरच बदलून जाईल. आता या झाडावर परत पक्ष्यांचा चिवचिवाट सुरु झालाय. वर्षभरापूर्वी जोराच्या हवेनं  जराही न हलणा-या या झाडाच्या फांद्या आता पक्ष्यांच्या बसण्या-उठण्यानं हलल्या अनं डौलल्या, की या झाडात जणू एक नवी चेतना जागल्यासारखं वाटत असतं...
खरंच, या वेलीनं झाडाच्या उरल्या-सुरल्या जीवनाला नि स्वतःच्या जीवनालाही अर्थ मिळवून दिलाय. निसर्ग आपल्याला छोटया-छोटया गोष्टींतून काहीतरी सांगत असतो. त्यासाठी त्याची भाषा... त्याचं गीत-संगीत आपल्याला कळायला हवं एवढचं. समर्पण म्हणजे नेमकं काय असतं... हे या वेलीकडं बघताना सारखं मनात बिंबतं राहतं. या झाडात नि वेलीत मला दिसत होतं ते, नात्यांपलीकडचं एक नातं... नवं नि अनोखं...शब्दांतूनही व्यक्त न करता येण्यासारखं!



Thursday 20 September 2012

ती : श्रद्धा नि सकारात्मक ऊर्जा


लेखन- लखीचंद जैन
***
नेहमीप्रमाणं  याही  वर्षी माझ्या घरी दहा दिवसांच्या श्रीगणेशाचं आगमन झालंय. या वेळी मुलांचा उत्साह जरा जास्तच आहे. अमित कॉलेजला गेल्यानं त्याचं नवीन फ्रेण्ड्सचं सर्कल जमलंय आणि क्षितिजच्या सोबतीला फेसबुक भेटलंय. घरात नुसती धमालउत्सवी वातावरण आहे. प्रत्येकाचा ‘श्रीगणेशा’ घरी येताच फेसबुकवरही अपलोड झालाय आणि त्याला लाइक्स मिळताहेत...शेअर केलं जात आहे. यंदाचा गणेशोत्सव मात्र जरा हटकेच आहे.
खरोखर, ‘श्रीगणेशा’च्या आगमनानं अवघं वातावरण कसं भक्तिमय होऊन जातं. बच्चे कंपनी तर गणेशाच्या येण्यानं इतकी भारावून जाते, की गणेशाच्या रूपात त्यांना जणू दहा दिवसांसाठी एक खास दोस्त भेटायला आलेला असतो. गणेशासोबत त्यांची इतकी गट्टी जमते, की विसर्जनाच्या वेळी अक्षरशः त्यांचे डोळे पाणावतात. विसर्जनानंतर काही मुलं तर एवढी हिरमुसतात, की ती दोन-तीन दिवस कुणाशी धड बोलत ही नाहीतनीट वागत नाहीतकाही खात नाहीत की पीत नाहीत. लहानग्यांची जी अवस्था होते तशीच अवस्था मोठयांचीही होतेअसं का होतं? आणि यामागचं नेमकं कारण तरी काय?  खोलात शिरलं की उत्तर हाती येतंते उत्तर म्हणजे आपल्याशी जुळलेली ‘ती’  ती म्हणजे श्रीगणेशाच्या प्रती असलेली श्रद्धा. 
वयाच्या नवव्या वर्षापासून माझी ही गट्टी जुळलीय ‘गणेशा’शी, ती शाडू आणि कौलं बनविण्यासाठी लागणा-या मातीच्या माध्यमातून. त्या वयात मी शाळा सुटल्यानंतर मातीसोबत खेळत बसायचो, मातीत नव-नवे आकार शोधायचो आणि गणेशाच्या मूर्तीही  बनवायचो
हळूहळू मातीची सोबत सुटली नि तिची जागा पेन्सिलीनं घेतली. कागदावर चिडीमिडी चित्रं काढण्याचं वेड त्या वयात मला लागलं होतं. या वेडेपणातून मी दिवाळीला माझ्या घराच्या ओटयावरच्या भिंतीवर ५ ते ७ फूट उंच गणपती व इतर देवी-देवतांची चित्रं काढायचो कधीकधी गावकरी मंडळी मी रंगविलेल्या गणपतीला नमस्कार करून तिथं दहा-वीस पैसे ठेवून जात या जमलेल्या पैशांतून त्या वेळी माझा लिमलेट गोळ्यांचा आणि रंगांचा खर्च निघायचा.
दहावीनंतर औरंगाबादच्या स्कूल ऑफ आर्टमध्ये पाऊल ठेवलं. इथनं सुरू झालेल्या कलाप्रवासात मी ‘मांडण्या’तून गणेशाची कितीतरी रूपं मांडलीय कॅनव्हासवर. त्यातली काही विदेशातही पोहोचलीय. भरभरून दिलंय गणेशानं. अजूनही मी गणेशाच्या नव-नव्या रूपांच्या शोधात असतो.
पंधरा वर्षांपूर्वी मुलांमध्ये संस्कारांची पेरणी व्हावी, या भावनेतून घरात दहा दिवसांचा गणपती बसवयाला सुरवात केली होती. आता मुलं जसजशी मोठी होताहेत तसतशी, ती माझ्याप्रमाणं ‘श्रीगणेशा’शी घट्ट जुळत चालली आहेत. आता तर घरातल्या दहा दिवसांच्या गणपतीची आरती व पुजेची जबाबदारी त्यांनी स्वीकारलीय.
गणेशोत्सवाच्या काळात, कामानिमित्तानं मी भारतात कुठंही असलो, तरी श्रीगणेशा मात्र मला स्थापनेच्या किंवा विसर्जनाच्या दिवशी बोलावूनच घेतो. याही वेळी मी स्थापनेच्या दिवशी घरी नव्हतो; अजून ३-४ दिवस मुंबईबाहेर असेन. मला पूर्ण विश्वास आहे, की विसर्जनाच्या पूर्वी माझी नि ‘श्रीगणेशा’ची भेट जरूर होणार आहे. त्यामागचं कारण म्हणजे त्याच्याप्रती असलेली माझी ‘ती’ नितळ श्रद्धा.
माझ्या मते, जीवन प्रवासात आपण कुणावर तरी श्रद्धाविश्वास ठेवणंसमर्पित होणं गरजेचं आहे. श्रद्धा ही एखादी मूर्ती, व्यक्ती, प्रवृत्ती, मूर्त-अमूर्त आकृती किंवा कलाकृती केंद्रित असू शकते. शिवाय, श्रद्धा ही एक अशी गोष्ट आहे, की जी वास्तवात नाही; पण तिचं अस्तित्व मात्र जरूर आहे. एकदा आपण ‘ती’चं अस्तित्व मान्य केलं ‘ती’च्याशी जुळत नि समर्पित होत गेलं की मग; तिच्या माध्यमातून आपल्याला एकप्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळत जाते. नवं सृजन घडविण्यासाठी आत्मविश्वासानं पुढं पाऊल टाकण्यासाठीउत्सवी जीवन जगण्यासाठी

Tuesday 18 September 2012

ऊन-सावली


लेखन- लखीचंद जैन

 
 काही दिवसांपूर्वी कामाच्या निमित्तानं पुण्याला जाणं झालं. स्वारगेटला एका बसथांब्यावर शहर बसची वाट बघत उभा असतांना सायकली दु-चाकीचारचाकी वाहनांच्या आणि माणसांच्या वर्दळीत समोरच्या दिशेला ऊन-सावलीच्या खेळातून वेगवेगळ्या पृष्ठभागांवर पडणा-या छाया-प्रकाशाचा आनंद मी घेत होतो.
ऊन-सावलीचा खेळ तसा मला नव्याने नव्हता. लहानपणापासून या खेळाची मजा मी अनुभवत आलोय. ललित कलेच्या क्षेत्रात पाऊल ठेवल्यापासून तर ऊन-सावली आणि त्यातून तयार होणारा छाया-प्रकाश आणि पोत या कडे  बघण्याची दृष्टीच बदलली आहे; पण आजचा खेळ बघतांना मला वेगवेगळं काहीतरी जाणवत होतं. कारण, माझ्या डोक्यात जो विषय घोळत होता; ‘त्याविषयाशी या खेळाची नाळ कुठेतरी जुळली असल्याचं सारखं वाटत होतं. बसच्या प्रतीक्षेत ऊन-सावलीच्या खेळाची नव्यानं उजळणी झाली.  
बघता-बघता डोक्यावरचा सूर्य ढगाआड जातो नि हळूच ऊन जाऊन सावली येते; मग पुन्हा ढगाआडून सूर्य समोर येतो नि सावली जाऊन परत ऊन पसरतं. चित्रपटातलं एखादं दृश्य Fade in.. Fade out व्हावं, त्याप्रमाणं ऊन, सावलीत आणि सावली उन्हात अलगदपणे एकरूप होत असते, एकमेकांत मिसळत असते. असंच काहीसं ती आणि मीतल्या नात्याचं असतं. सकाळ, दुपार आणि मावळतीला पसरणा-या ऊन-सावलीचा अनुभव वेगवेगळा असतो. प्रत्येक प्रहरातल्या ऊन-सावलीच्या खेळाची आपली वेगळी अशी खासियत आहे.
ऊनसावलीच्या खेळासारखा खेळप्रत्येक जण आपल्या जीवनात सुख-दु:खाच्या रूपात अनुभवत असतो. यात ती आणि मीया दोघातलं नातं जर घट्ट असेल, दोघांना आपापली भूमिका नि जबाबदारी नीट ठाऊक असेल. शिवाय, सामंजस्यपणा त्याच्या जोडीला असेल तर भरती-ओहोटीत अर्थात् सुख-दु:खाच्या काळातही आपल्याला ऊन-सावलीच्या खेळाची रंगत एन्जॉयकरता येते.
उन्हात फिरून, घामानं चिंब भिजून सावलीच्या आडोश्याला आलं, की सावलीचा...सावलीच्या सोबतीला असलेल्या हवेच्या झुळुकीचा स्पर्श नि तिच्या गारव्याचा आनंद आपल्याला घेता येतो. यातच खरी मजा असते... जगण्याची, जीवनातल्या ऊन-सावलीची..!

Monday 17 September 2012

नात्यांची अदृश्य साखळी ...


लेखन- लखीचंद जैन
***

नेटकरी मित्रांनों,
आठवडयापूर्वी ती आणि मीया ब्लॉगवर अपलोड केलेल्या माझ्या पहिल्या पोस्टला आपण सगळ्यांनी मनापासून दाद दिली. काहींनी फेसबुकवर मेसेजही पाठविले. त्यासाठी सर्वांचं मनापासून आभार! या ब्लॉगच्या निमित्तानं नव्या- जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. शिवाय, वेगवेगळ्या क्षेत्रांतील मित्र - मैत्रिणींसोबत उलटसुलट संवादही झाला. या संवादातून ‘ती आणि मी’ भोवतीच्या एकमेकांत नि भावनिकतेत गुंफलेल्या, तर काही गुंतागुंतीच्या गोष्टी समोर आल्या. मग सहजच वाटायला लागलं, की पहिल्या पोस्टमध्ये उल्लेख केल्याप्रमाणं ‘ती आणि मी’ हा विषय खरोखर इंट्रेस्टिंग आहे.

या पोस्टला लिहायला सुरवात केल्यावर, नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणं ‘ती आणि मी’ हा विषय दिसू लागला. एका बाजूला विवाहित आणि दुस-या बाजूला अविवाहित. विवाहितांच्या बाजूला ‘ती’ ही पत्नी म्हणून जुळलेली दिसत होती, तर अविवाहितांच्या बाजूनं ‘ती’च्या रूपात ही जन्मदाती साक्षात आई, बहीण, प्रेयसी अशा नात्यांची गुंफण होतीयाशिवाय प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणं जुळलेली इन्स्पिरेशन्सएखादी जबाबदारीकिंवा अजून इतर काही...

प्रत्येकाच्या आयुष्यात बालपण, तारुण्य आणि प्रौढत्व या तीन महत्त्वाच्या टप्प्यांत कळत-नकळत अनेक ‘ती’ जुळत जाऊन एक अदृश्य साखळी तयार होत असते; ‘ती’च्या नात्यांची आणि या साखळीतील एक कडी अशी असते, की ‘ती’ इतर सर्व कड्यांना घट्ट पकडून ‘मी’ला सपोर्ट करीत असते. इतरांपेक्षा ‘ती’ची भावनिक संलग्नता जास्त जवळची असते. दोघं एकमेकांपासून दूरही राहिले तरी; त्यांच्या हृदयाची स्पंदनं एक-दुस-यासाठी धडधडत असतात...

बदलत्या काळाप्रमाणं, त्यातून निर्माण झालेल्या गरजांपोटी विभक्त कुटुंबपद्धत अस्तित्वात आल्यानं ती आणि मी’च्या जीवन जगण्याच्या संकल्पना, आव्हानं आणि जबाबदा-याही बदलत चालल्या आहेत.

हल्लीच्या काळात ‘ती’ आणि ‘मी’ हे आपलं नातं कशा पद्धतीनं वीणताहेत यावरून त्यांची ‘ती’ वीण केवढी घट्ट होत जाईल किंवा विस्कटत जाईल, याचा पुसटसा अंदाज त्यांच्याशी जुळालेल्यांना येत असतो.

‘ती आणि मी’मधलं नातंच वेगळं. कधी शब्दांत सांगण्यासारखं, तर कधी शब्दांतूनही व्यक्त न करता येण्यासारखं. टिकलं तर समजावं; आपण खूपकाही मिळवलं आणि विस्कटलं, तर आपल्या जवळचं काहीतरी हरवलं, असं मानून स्वत:नं स्वत:च्या मनाला समजवावं...