Sunday 23 September 2012

नात्यांपलीकडचं नातं

 

लेखन- लखीचंद जैन
***
साधारणपणे तीस-पस्तीस फूट उंचीचं एक झाड आहे... बदामाचं! अवती-भोवतीच्या बहरलेल्या झाडांच्या गर्दीतही हे झाड मात्र, माझं सारखं लक्ष वेधून घेत असतं... तसं पाहिलं, तर विशेष असं काहीही नाही या झाडात; पण आपली बघण्याची दृष्टी जर वेगळी असेल. शिवाय, निसर्गाशी गुजगोष्टी करण्याची सवय असेल तर ‘ते’ आपल्याला बरंच काही सांगून जातं... देऊन जातं...
हे झाड पूर्वी खूप बहरायचं.. फुलायचं.. या झाडाच्या फांद्यांवर पक्ष्याचं रोजचं उठणं-बसणं होतं. मात्र, तीन-साडेतीन वर्षांपूर्वी या झाडाला कुठलीतरी कीड... व्याधी लागली. बघता-बघता बहरलेलं हे झाड उजाड झालं... एकेक करत पानांनीही त्याची सोबत सोडली. पक्ष्यांनीही उठणं-बसणं बंद केलं... सालही वाळून त्याच्यापासून अलग होत गेली आणि हे झाड पांढरफट्टक पडलं, माणसाच्या हाडाचा सापळा कसा दिसतो तसं! मात्र, अजूनही हे झाड तग धरून आहे. कुठल्यातरी आशेनं.. हे चित्र होतं गेल्या वर्षांपर्यंतचं...
आताचं चित्र काहीसं वेगळं आहे.... हे झाड आजही जसंच तसं उभं आहे. गेल्या वर्षी माळ्यानं या झाडाच्या बाजूला एक बोगन वेल लावली. ती रुजली... हळूहळू वेल वाढत होती… कुठल्यातरी निमित्तानं तिची या झाडाशी ओळख झाली... दोघांची चांगली गट्टी जमली नि ओळख ‘मैत्री’त बदलली.... मग ती त्याला बिलगत... वेढत गेली. आता ही वेल खुललीय... फुललीय... तिला सुंदर अशी गुलाबी फुलंही लागलीय. फांद्या-फांद्यांवर वेल मुक्तपणे खेळत... पसरत... वरवर चढत चाललीय. शिवाय, तिला भरभरून फुलं लागल्यामुळे आता एक वेगळीच रौनक आलीय या झाडाला... मृतप्राय झाडात या वेलीनं एक नवा श्वास भरलाय... आणखी काही काळ जगण्यासाठी...!
काही दिवसांतच ही वेल या झाडाच्या फांद्यांसोबत खेळत शेंड्यापर्यंत जाईल. शिवाय, तिच्या फुलांच्या संख्येत अजून काही फुलांची भर पडेल, तेव्हा या झाडाचा नूरच बदलून जाईल. आता या झाडावर परत पक्ष्यांचा चिवचिवाट सुरु झालाय. वर्षभरापूर्वी जोराच्या हवेनं  जराही न हलणा-या या झाडाच्या फांद्या आता पक्ष्यांच्या बसण्या-उठण्यानं हलल्या अनं डौलल्या, की या झाडात जणू एक नवी चेतना जागल्यासारखं वाटत असतं...
खरंच, या वेलीनं झाडाच्या उरल्या-सुरल्या जीवनाला नि स्वतःच्या जीवनालाही अर्थ मिळवून दिलाय. निसर्ग आपल्याला छोटया-छोटया गोष्टींतून काहीतरी सांगत असतो. त्यासाठी त्याची भाषा... त्याचं गीत-संगीत आपल्याला कळायला हवं एवढचं. समर्पण म्हणजे नेमकं काय असतं... हे या वेलीकडं बघताना सारखं मनात बिंबतं राहतं. या झाडात नि वेलीत मला दिसत होतं ते, नात्यांपलीकडचं एक नातं... नवं नि अनोखं...शब्दांतूनही व्यक्त न करता येण्यासारखं!



No comments:

Post a Comment